माझ्याविषयी थोडेकाही..

blogprofile

मी शिल्पा केळकर-उपाध्ये. माझ्या या लेखांविषयी थोडेसे. लहानपणापासून घरातल्या बऱ्याच जणांना लिहिता-बोलता-वाचताना पाहिलेले. माझे बाबा कुठल्याही प्रसंगाची अतिशय उत्तम गोष्ट करून सांगण्यात एकदम तरबेज. सगळे काका-आत्या पण त्याच पठडीतले. पुस्तकातले संदर्भ, सुभाषिते, कविता सारे हुकुमी एक्क्यासारखे आठवणारे आणि तोंडपाठ देखील. सगळेजण शिक्षक. सांगण्या-बोलण्याची उत्तम हातोटी. त्यामुळे उत्तम लिहिता येणे, एखाद्या गोष्टीचे वर्णन करणे म्हणजे वेगळे काहीच नाही, सगळेच असे बोलतात असे वाटे. मग नंतर नंतर समजू लागले की  हे तर विशेष आहे. आपल्यावर खूप चांगले संस्कार झाले आहेत या सर्वांकडून.

मग भारत सोडला. बाहेच्या जगातले सगळेच नवीन – वेगळे. आधीपासून अंगवळणी पडलेल्या सवयी विसरून वेगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची वेळ. त्या मध्ये होणारी ओढाताण आणि मनात जुन्या-नव्याच्या तुलनेचा संघर्ष. या प्रक्रियेतून जाताना हळूहळू लिहायला सुरुवात झाली. लिखाण हे त्यासाठी एक प्रकारचे उत्तम विरेचन (catharsis) वाटू लागले. त्यामुळे साहजिकच  माझ्या सगळ्या लिखाणात “इकडचे-तिकडचे” असे सतत जाणवेल. ते काहीसे साचेबद्ध वाटेल हेही खरे पण त्यातला वेगळेपणा टिकवण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न केला आहे. जसजसे लिहित गेले तशी माझी एक शैली तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तो कदाचित मराठी व्याकरणाच्या नियमात बसणारा नसेलही. कमीतकमी शब्द वापरून, वाचकाला सतत एकाच काळात (वर्तमानात) ठेवून कथा उभी केली  तर ती जास्त चित्रमय होते असे मला जाणवू लागले. आणि तसे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

महेश एलकुंचवार म्हणतात की “माणसाने चाळीशी ओलांडल्याशिवाय लेखणी घेऊच नये हातात. आणि मग पन्नाशीनंतर लिहिलेलं वाळवावे.” त्यामुळे माझे लिखाण अजून ओलेच आहे -हे मनातले कागदावर आलेले कधी वाळले तर वाळेल नाहीतर उडूनही जाईल….

इथे भेट देऊन लिखाण वाचल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

 

 

2 thoughts on “माझ्याविषयी थोडेकाही..

Leave a comment